नाशिक - ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा कुटुंबांना आधार कार्डवर रेशन द्यावे, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देशाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे. आज केंद्रीय मंत्री पासवान यांनी प्रत्येक राज्यातील अन्न व पुरवठाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.
![शिधापत्रिका नसणाऱ्यांना आधार कार्डवरच रेशन द्यावे; भुजबळांची केंद्राकडे मागणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-bhujbalpasvanvc-7204957_13042020182855_1304f_1586782735_943.jpg)
केशरी रेशन कार्डधारकांना रेशन देण्याबरोबरच ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा कुटुंबांना आधार कार्डवर रेशन देण्यासाठी केंद्र सरकारने भरीव मदत करावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली. आज रामविलास पासवान यांच्या उपस्थितीत देशातील सर्वच राज्यांच्या अन्न नागरी पुरवठा मंत्री यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बैठक पार पडली. यादरम्यान भुजबळ यांनी केंद्र सरकारकडे ही मागणी केली आहे.
![शिधापत्रिका नसणाऱ्यांना आधार कार्डवरच रेशन द्यावे; भुजबळांची केंद्राकडे मागणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-bhujbalpasvanvc-7204957_13042020182855_1304f_1586782735_859.jpg)
केंद्र सरकारने भुजबळांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील लाखो कुटुंबाची अन्नाची गरज भागली जाणार असल्याचेही भुजबळ म्हणाले. महाराष्ट्र राज्यात 7.5 कोटी शिधापत्रिकाधारकांना राज्य सरकार 1 रुपये, 2 रुपये, तीन रुपये दराने अन्नधान्य देत असून मात्र ज्यांच्याकडे कार्ड आहे मात्र त्यांना धान्य मिळत नाही अशी 2 कोटी लोक आहेत त्यांना पुढील दोन महिन्याचे अन्न धान्य मिळावे ह्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडून 600 कोटी रुपयांचे धान्य विकत घेणार आहे, मात्र असलं तरी देखील 2 कोटी लोक अशी आहे त्यांच्याकडे कार्ड नाही मात्र ते गरीब आहे अशा नागरिकांना आधार कार्डवर मोफत अन्नधान्य मिळावे, अशी मागणीदेखील पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पासवान यांच्याकडे केली.