नाशिक - येथील इंदिरा नगरातील साईनाथ नगर परिसरात असलेल्या एका दुकानात चोरी करण्याच्या हेतूने ३ जण आले होते. त्या तीन जणांच्या टोळीला एका युवतीने पळून लावल्याची घटना घडली आहे.
इंदिरा नगर येथील साईनाथ नगर परिसरात भावे प्लास्टो या दुकानात दोन महिला आणि एक पुरुष ग्राहक म्हणून दाखल झाले. या दुकानाचा कर्मचारी असलेल्या पूजा कळमकर या युवतीला वेगवेगळ्या कारणांनी गुंतवून ठेवले होते. त्यांनी तिची पर्स व गल्ला त्यांनी लंपास केला. ही गोष्ट या युवतीच्या लक्षात येताच तिने त्या तिघा चोरट्यांचा प्रतिकार केला.
यामध्ये एक महिला चोराच्या हातातील पर्स खाली पडली. त्यानंतर त्या दोघे महिला व पुरूष तिथून पसार झाले. त्यानंतर या पर्स बघितले असता, त्यामध्ये अनेक पाकीट, आधार कार्ड, पॅन कार्ड यासोबत चाकू मिळून आले. दुकानाचे मालक जितेंद्र भावे यांनी ताबडतोब याची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
चोरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये चोऱ्या, दरोडे, घरफोड्या, चेन स्नाचिंग सारख्या घटना वाढत आहेत. यामुळे व्यावसायिकांमध्येही असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. यावरून चोऱ्या करणाऱ्या टोळ्या नाशिकमध्ये सक्रिय झाल्या आहे, ते अशा घटनांवरून दिसून येत आहे. आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी कठोर भूमिका घेत चोरी करणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे.