नाशिक - राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. त्यामुळे राज्यात ज्या ठिकाणी पाण्याच्या टँकर आणि चाराछावण्यांची गरज आहे, अशा ठिकाणी येत्या आठवड्याभरात चारा छावण्या पाण्याचे टँकरची सुविधा पुरविण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती दिली.
आज महाराष्ट्रा दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी नाशिकमध्ये उपस्थित होते. त्यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबतची माहिती दिली.
महाजन म्हणाले, राज्यातील सर्वच मंत्री मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने लवकरच राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहणी करणार आहेत. राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या ठिकाणच्या प्रशासनाला माहिती घेण्याच्या सुचना देऊन उपायोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. म्हणून मनमाड, नांदगाव, येवला, सिन्नर या भागात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. लवकरच अतिरिक्त टँकर व चारा छावण्या शासनाकडून सुरू करण्यात येणार आहे.जिल्ह्यात आतापर्यंत अडीचशे टँकरच्या माध्यमातून पाणी वाटप सुरू आहे. लवकरच शासनाच्या माध्यमातून चारा छावण्या चालू करण्यात येतील.
तसेच मराठवाडा-विदर्भ येथे देखील चारा छावण्या व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशा ठिकाणची पाहणी करून तिथे देखील चारा छावण्या व पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.