नाशिक - राज्यात एकीकडे बांधकाम विभाग रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली जात असताना दुसरीकडे घोटी-सिन्नर हा महामार्ग घोटी ते बेलगाव तऱ्हाळे दरम्यान पुर्णतः उद्धवस्त झाला आहे. प्रचंड मोठे खड्डे या मार्गावर पडले आहेत. या मार्गावर वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शिर्डीला जाणारे भाविक संताप व्यक्त करत आहेत.
घोटी सिन्नर या मार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. विशेष म्हणजे, या महामार्गावरून आमदार-खासदार, शिर्डीला येणारे व्हीआयपी लोकांच्या गाड्या धावत असतात. तरीदेखील या रस्त्याची दुरवस्था कायम आहे.
घोटी येथून भंडारदरा, टाकेत, शिर्डीसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक या रस्त्याने जात असतात. त्यामुळे बांधकाम विभागाने या मार्गाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे आणि प्रवाशांच्या जीवघेणा प्रवासातून सुटका करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.