नाशिक : पावसाळा सुरू झाला की, बाप्पाच्या आगमनाचे भक्तांना वेध लागतात. बहुतांशवेळा पावसाळ्याच्या उत्तरार्धाच्या प्रारंभीच बाप्पाचे आगमन होत असते. यंदा मात्र गणरायाचे आगमन हे, सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच पावसाळ्याच्या अगदी शेवटी होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी अधिकमास असल्यामुळे बाप्पाचे आगमन 19 सप्टेंबरला होणार आहे. अशात अनंत चतुर्दशीच्या दिवशी ईद-ए-मिलाद असा योग जुळून आल्याने, पोलीस प्रशासनावर अधिक ताण असणार आहे.
श्रावण महिना लांबला : यंदा श्रावण अधिक मास आला आहे. त्यामुळे आषाढ अमावस्येनंतर दुसऱ्या दिवसापासून अर्थात 18 जुलैपासून अधिक श्रावण महिन्यास प्रारंभ होत आहे. तसेच श्रावण महिना हा तब्बल 15 सप्टेंबरपर्यंत लांबला आहे. त्यामुळे भाद्रपदाचा प्रारंभ 16 सप्टेंबरला होत असला तरी, भाद्रपदातील चतुर्थी 19 सप्टेंबरला असल्याने त्याच दिवशी बाप्पाचे सर्वात जल्लोषात आगमन होणार आहे.
मूर्तिकारांची प्राथमिक तयारी : मागील वर्षी गणपती बाप्पाचे आगमन ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अर्थात 31 ऑगस्टला झाले असेल तरी, त्या तुलनेत यंदाच्या वर्षी गणपती बापांच्या आगमनाला काहीसा विलंब होणार आहे. 19 सप्टेंबरला बाप्पा विराजमान होणार आहे, गणरायाचे आगमन विलंबाने होणार असल्याने मूर्तिकार देखील अद्याप केवळ चिकनमातीसह अन्यसामग्री गोळा करत आहे, तर काही मूर्तिकारांनी नुकताच प्रारंभ केला आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी ईद-ए-मिलाद : गणेश विसर्जन 28 सप्टेंबरला होणार आहे. विशेष म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी अर्थात 28 सप्टेंबरलाच ईद-ए-मिलाद असा योग देखील जुळून आला आहे. त्यामुळे या दिवशी पोलीस प्रशासन व्यवस्थेवर बंदोबस्ताचा मोठा ताण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने देखील पोलीस प्रशासनाकडून तयारी केली जाणार आहे.
दहाव्या दिवशी केले जाते विसर्जन : गणेशजींच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी गणरायाला शीतलता मिळावी यासाठी, गणरायाच्या शरीरावर मातीचा लेप लावण्यात आला. त्यानंतर सरोवरात डुबकी घेतली. कथेनुसार, ज्या दिवशी गणेशजींनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली तो दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्ष चतुर्थीचा दिवस होता. तर ज्यावेळी महाभारत पूर्ण लिहून झाले तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. तेव्हापासून गणेश चतुर्थीला गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. दहाव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते.
हेही वाचा -