नाशिक : गावात तीन स्मशानभूमी असतानाही अंत्यसंस्काराविना मृतदेह पडून राहिला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अग्निडाग देऊन अंत्यविधी उरकल्याची ( Funeral In Front Of Gram Panchayat ) धक्कादायक घटना चांडवड तालुक्यातील खडकजांब गावात ( Khadakjamb Village Chandwad Nashik ) घडली.
खाजगी वादातून स्मशानभूमी बंद : खडकजांब येथील तीनही स्मशानभूमी खाजगी वादामुळे बंद आहेत. त्यामुळे गावात कोणाचा मृत्यू झाला तर ग्रामस्थ स्वतःच्या शेतात अंत्यसंस्कार करू लागले असून, ही आता या गावाची प्रथा झाली आहे. खडकजांब येथील अमोल अशोक कोकाटे (वय २५) या आदिवासी तरुणाचा शनिवारी (दि. १६) मृत्यू झाला. त्यांना जमीन नसल्याने आता अंत्यविधी करायचा कुठे? असा प्रश्न कुटुंबीयांना पडला. कुटुंबातील सदस्यांनी ग्रामपंचायत गाठली. अंत्यसंस्कार कुठे करायचे, असा प्रश्न विचारला. मात्र, प्रशासन व सरपंचांकडे याचे उत्तर नव्हते. आप्तेष्टांनी दहा तास सरकारी कार्यालयांत खेटे घातले. अनेक जागा शोधल्या. मात्र, अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा काही मिळेना. अखेर शोधाशोध करून ग्रामपंचायतीसमोरच कसाबसा अंत्यविधी उरकला. गावाच्या स्मशानभूमीची जागा मोकळी होईल का? की वेळोवेळी आदिवासी, दलित, मागासवर्गीय कुटुंबातील नागरिकांना अंत्यविधीसाठी ग्रामपंचायत गाठावी लागेल, असा प्रश्न विचारला जात आहे.
स्मशानभूमीला तारेचे कुंपण : एका स्मशानभूमीनजीक असलेल्या भूखंडधारकांनी स्वतःचे भूखंड सांगून स्मशानभूमीलाच तारेचे कुंपण घालून ती बंदिस्त केली आहे. दुसऱ्या स्मशानभूमीबाबतही एका बिल्डरने स्वतःची जागा सांगून तेथे तारेचे कुंपण करून ती बंदिस्त केली आहे. तिसऱ्या स्मशानभूमीच्या जागेवर बिल्डरने हक्क सांगितला आहे. या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे नागरिकांना आपापल्या शेतात किंवा अशाप्रकारे उघड्यावर अंत्यविधी करावे लागतात. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
२०१७ पासून मृतदेहाची हेळसांड : गावात तीन स्मशानभूमी आहेत. मात्र, त्या वादाच्या भोवऱ्यात आहेत. ग्रामपंचायतीच्या जागेत असतानाही येथील काही भूखंडधारकांनी स्वतःची जागा असल्याचे सांगून त्या ठिकाणी कब्जा केला आहे. ग्रामपंचायतीमार्फत न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत तेथे अंत्यविधी होऊ द्यावा, अशी प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र, शासन दरबारी कोणतीही हालचाल नाही. परिणामी २०१७ पासून मृतदेहाची हेळसांड होत असल्याचे दर्शन आहिरे, सरपंच, खडकजांब यानी सांगितले आहे.
हेही वाचा : व्यवस्थेच्या झळा! हंडाभर पाण्यासाठी महिला मरणाच्या दारात