नाशिक - श्रीनगर येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराने निधन झालेल्या नाशिकच्या आडगाव येथील लष्करी जवान आप्पासाहेब मते यांना पाणावलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी निघालेल्या अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमुदाय उसळला होता.
हेही वाचा - श्रीनगर जवळ कर्तव्य बजावताना नाशिकच्या लष्करी जवानाचा हृदयविकाराने मृत्यू
श्रीनगरच्या पुढे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या उंच भागातील एका चौकीवर तैनात असलेले आप्पासाहेब मते यांचा ऑक्सिजन कमी पडल्याने हृदयविकाराच्या झटक्याने 7 जानेवारीच्या रात्री मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव शुक्रवारी नाशिकमध्ये आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर आडगावच्या स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा - 'कामगार विरोधी' धोरणांना विरोध करण्यासाठी नाशकात कामगार संघटनांचा भव्य मोर्चा !
यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले यांच्यासह शेफाली भुजबळ यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अंत्ययात्रेसाठी पंचक्रोशीतील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - नाशिकमध्ये सोन्यापाठोपाठ, पेट्रोलच्या दरातही वाढ
आप्पासाहेब मते हे अल्पभूधारक शेतकरी असून आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने त्यांचे शिक्षण पूर्ण केले. 2006 साली ते सैन्यात भरती झाले होते. मागील वर्षात त्यांचा करार संपल्यानंतर त्यांनी पुढे चार वर्षांचा करार वाढवून घेतला होता. सेवानिवृत्त न होता त्यांनी देशाप्रती असलेल्या प्रेमापोटी हा करार वाढवून घेतल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी अकरा वर्षांचा मुलगा, भाऊ असा परिवार आहे.