नाशिक - कृषी विभागाच्या विविध योजना मंजूर करून घेत त्यांच्या खोट्या निविदा काढून सुमारे 147 शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनीच गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2011 ते 2017 या कालावधीत हा प्रकार झाला आहे. यात तब्बल 50 कोटींची फसवणुक झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी घेतली दखल
पेठ तालुक्यात 2011 ते 2017 या कालावधीत बोगस कामे व कागदपत्रे दाखवून कृषी विभागाच्या सुमारे 16 अधिकाऱ्यांनी इतर नागरिकांनी सहा वर्षांत शासनाची सुमारे 50 कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एक ट्रॅक्टर चालक शेतकरी योगेश सापटे याने थेट न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश पेठ तालुका पोलिसांना दिले आहेत. यातील काही अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित कृषी अधिकाऱ्यांचा सहभाग तसेच गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता, ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी हा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग केला आहे.
50 कोटी 72 लाखांचा भ्रष्टाचार
पेठ तालुक्यातील कृषी विभागातर्फे सन 2011 ते 2017 या कालावधीत 50 कोटी 72 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा अर्ज पेठ तालुक्यातील हेदपाडा एकदरे येथील शेतकरी योगेश सापटे यांनी पेठच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सादर केला होता. न्यायालयाने पेठ पोलीस ठाण्याला याबाबत तपास करण्याचा आदेश दिल्याने 5 जानेवारी 2022 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार काम न करताच बिल काढण्यात आली आहे. अशी तक्रार पुढे आली आहे. याप्रकरणी अजून कोणाची फसवणूक झाल्याचे नाकारता येत नाही. म्हणून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - puppies were beaten: धक्कादायक..पाळीव कुत्र्यांच्या तीन पिल्लांना काठीने बदडून ठार मारले