नाशिक- येथील नाशिक-पुणे महामार्गावर पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या गाड्य़ांना जोरदार अपघात झाला. संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार शिवारात झालेल्या पहिल्या अपघातात समांतर जात असताना कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारची पुढील बाजू टेम्पोला धडकून दोन जण जखमी झाले. तर आंबी फाटा येथे झालेल्या दुसऱ्या अपघातात दुचाकी व कार यांच्यात धडक होऊन दोन जण जखमी झाले.
कर्जुले पठार शिवारात झालेल्या पहिल्या अपघातात टेम्पो चालकाने स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्नात टेम्पो दुभाजक ओलांडून पलीकडच्या रस्त्यावर जाऊन लगतच्या लोखंडी कठड्यावर गेला. सुदैवाने या कठड्यावर अडकल्याने टेम्पो महामार्गाच्या खाली गेला नाही. यामुळे टेम्पो चालक योगेश गोपीनाथ शेळके (रा.निमगाव पागा ता.संगमनेर) व अन्य एक असे दोघेजण बचावले. टेम्पो चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे कारमधील सचिन बाबुराव पाटील यासह त्यांची पत्नी व दोन लहान मुले (रा.शिगाव ता.वाळवा जि.सांगली )हे चौघेजण सुदैवाने बचावले.
तर दुसऱ्या अपघातात नाशिक-पुणे महामार्गावर आंबी फाटा येथे दुचाकी व कारच्या अपघातात दोन जण जखमी झाले. यात मनोहर नाथा मेंगाळ (वय 20) व नाथा यशवंत मेंगाळ (वय 55) हे बैल पोळ्याचा बाजार घारगाव येथून त्यांच्या घरी माळवदवाडी येथे घेऊन जात होते. आंबी फाटा येथे महामार्ग ओलांडत असताना नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या कारने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.