नाशिक - दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात रामेश्वर तालुका देवळा येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच तर एका जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. (four died from one family in accident) हा अपघात जिल्ह्यातील देवळा-नाशिक राज्य महामार्गावरील दुर्गा हॉटेल समोर घडला. (car-bike accident on deola-nashik road) दरम्यान एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.
कारची दुचाकीला जोरदार धडक -
देवळा-रामेश्वर येथील मळा शिवारातील हिरे कुटुंबातील चौघे जण पिंपळगाव येथून दुचाकीने शेतीच्या कामावरून घराकडे परतत होते. अशात देवळा-नाशिक राज्य महामार्गावरील रामेश्वर फाटा जवळ समोरून येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात हिरे कुटुंबातील गोपीनाथ हिरे (वय-42), मंगला गोपीनाथ हिरे (वय-35) हे पती-पत्नी आणि मुलगा गोरख गोपीनाथ हिरे (वय-16) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी जागृती गोपीनाथ हिरे (वय-18) ही गंभीर जखमी झाली. तिला मालेगाव येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तिचादेखील मृत्यू झाला.
हेही वाचा - नाशिक : शहरातील ८० रस्ते, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार
शेतातून परतत असताना आघात -
हिरे कुटूंब हे पिंपळगाव येथे वाट्याने शेती करत होते. तेथे त्यांनी कांदा लागवड केली होती. हे सर्व कुटूंब शेतात निंदणीचे काम करून सायंकाळी घरी परतत असताना काळाने संपूर्ण कुटुंबावर आघात केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.