नाशिक - बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील मृत कोरोनाग्रस्त तरुणाचे कुटुंबीय आणि संपर्कातील १० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन कामाला लागली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबीयांना तसेच संपर्कातील ४७ व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बागलाणचे प्रांताधिकारी विजकुमार भांगरे, गटविकासाधिकारी पी. एस. कोल्हे यांनी परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना करत गाव १४ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारी ३२ वर्षीय खासगी वाहनचालकास मालेगाव येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर या तरुणाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर रुग्णावर उपचार करणार स्थानिक खासगी डॉक्टर, मृताचे कुटुंबीय व संपर्कातील व्यक्ती अशा ११ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. सोबतच त्यांच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील १० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यानंतर जायखेडा व परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तयार करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत यातील ४७ व्यक्तींना विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले आहे. यात सोमपूर, जयपूर (मेढीपाडे), वाडीपिसोळ व जायखेडा येथील व्यक्तींचा समावेश आहे. संपर्कातील व्यक्तींनी स्वतःहून यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.