नाशिक - मालेगाव तालुक्यातील अंजन वडेलच्या निवासी वसतिगृहातील 114 विद्यार्थ्यांना अचानक पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. यामुळे यापैकी 90 विद्यार्थ्यांना वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात तर 24 विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नामपूर रस्त्यावर स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत सटाणा, कळवण, देवळा आदी भागातील एकूण 350 विद्यार्थी शिक्षण घेतात. तर याच शिक्षण संस्थेत निवासी वसतिगृहात 230 विद्यार्थी राहतात. आज शिक्षण संस्थेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. मात्र, यानंतर 114 विद्यार्थ्यांना पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने त्यांना शासकीय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वीही शाळेत वेळेवर जेवण दिले जात नाही. तसेच स्वच्छता राखली जात नाही. अश्या अनेक तक्रारी पालकांकडे केल्या. तेव्हा पालकांनी यासंदर्भात संचालकांकडे विचारणा केली. मात्र, संचालकांनी त्यांवर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संस्था संचालक व पालकांमध्ये वाद निर्माण झाला होता, अशी माहिती आहे.