नाशिक - नियमितपणे वातावरणात होत असलेल्या बदलांचा परिणाम पक्ष्यांवर देखील होत असतो. मनमाडला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणावर हिवाळ्यात येणाऱ्या फ्लेमिंगोचे यंदा पावसाळ्यात आगमन झाले आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी व पक्षीप्रेमींनी आनंद व्यक्त केलाय. पक्षीप्रेंमी हे फ्लेमिंगोज् पक्षी बघण्यासाठी धरणावर गर्दी करत आहे.
आकाशात भरारी घेणाऱ्या या सुंदर व आकर्षक फ्लेमिंगोचा स्थलांतरित पक्ष्यांमध्ये समावेश होतो. ते दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात येत असतात. मात्र, यंदा पावसाळ्यातच फ्लेमिंगो धरणावर दाखल झाले आहेत. त्यामुळे पक्षीप्रेमींना काहीसा सुखद धक्का बसला असून वातावरणीय बदलांमुळे यावर्षी फ्लेमिंगोचे हिवाळ्याच्या ऐवजी पावसळ्यात आगमन झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. परदेशातून हजारो लाखो किमीचा लांब प्रवास करून फ्लेमिंगो पक्षी मनमाडच्या वागदर्डी धरणावर आले आहेत. या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी पक्षी प्रेमींनी गर्दी केलीय. त्यांच्यासाठी या पक्ष्यांना पाहणे एक मेजवानी ठरत आहे.
निसर्ग वेळोवेळी आपले रूप बदलत असून त्याचा मानवाप्रमाणेच पक्षी व प्राण्यांवर देखील परिणाम होत आहे. त्याचाच प्रत्यय हे स्थलांतरित पक्षी पावसाळ्यात येण्यात झाला आहे.