नाशिक - देवळाली कॅम्प परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अवघ्या आठ दिवसात शहर पोलीस दलातील सात कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याने पोलीस आयुक्तालयाने निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे कामचुकार पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.
नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात दोन दिवसांपूर्वी एका युवकावर सराईत गुन्हेगारांकडून गोळीबार करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. देवळाली कॅम्प परिसरातील हाडोळा येथे राहणाऱ्या यश पवार या युवकावर सनी कदम या संशयीत सराईत गुन्हेगाराने गोळीबार केला होता. या गोळीबारात यश पवार याला 2 गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, या घटनेतील हल्लेखोर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने या प्रकरणाची पोलीस आयुक्तालयाने गंभीर दखल घेत या गुन्हेगारांची माहिती असलेल्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या या कारवाईत दोन पोलीस हवालदार तर 3 पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. मागील आठवड्यात देखील नाशिक शहरातील दोघा पोलीस भावांनी सामान्य नागरिकाला मारहाण केल्याची घटनेत दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या घटनेला आठ दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाल्याने कामचुका पोलीस कर्मचाऱ्यांचं धाबे दणाणले आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या या कठोर निर्णयानंतर तरी पोलीस दलातील ही मुजोरी आणि कामचुकारगिरी थांबेल अशी नाशिकरांना अपेक्षा आहे.