नाशिक - अंबड पोलीस ठाण्यात २ कोरोनाबाधित रुग्णांसह एका खासगी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना आजाराची लक्षणे असतानाही बाब लपवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 99 वर पोहोचली आहे. अशात अंबड येथील संजीवनगर भागात एका वृद्ध महिलेत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या अजून एकाला कोरोनाची लागण झाली. यापूर्वी ह्या महिलेवर परिसरातील एका शिकावू डॉक्टरने उपचार केले होते.
कोरोना विषाणूची लक्षणे असतानादेखील शासकीय रुग्णालयात रुग्णाला दाखल न करता स्वतः उपचार केल्याप्रकरणी अंबड महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून अंबड पोलिसांनी दोन कोरोना रुग्णांसह एका खासगी डॉक्टरविरोधात कोरोनाचा प्रसार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.