नाशिक - निफाड गावातील कॉलेज कॅम्पसमध्ये प्रपोज डे साजरा होत असताना, दोन गटात तुफान हाणामारी झाली. किरकोळ वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. हा हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल -
कॉलेजमध्ये तरुण-तरुणी उत्साहात फेब्रुवारी महिन्यातील विविध डे साजरे करत असतात. मात्र, निफाड येथे प्रपोज डेच्या दिवशी भलतंच घडलं आहे. येथील कॉलेज कॅम्पसमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. सध्या व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने विविध ‘डेज्’ सेलिब्रेट केले जात आहेत. अशात प्रपोज डे साजरा होत असतानाच ही मारामारी झाली. विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये अल्पशा कारणावरुन वाद झाला होता. या वादाचे रुपांतर फ्री स्टाईल फायटिंगमध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे. निफाड तालुक्यातील कर्मवीर गणपतराव मोरे कॉलेजबाहेर ही घटना घडली आहे.
दरम्यान, 8 फेब्रुवारीला ही हाणामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ काही जणांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या हाणामारीचे व्हिडिओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही डोंगरे वस्तीगृह मैदानावरील दोन विद्यार्थिनींचा हाणामारीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. निफाड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.