नाशिक - एकीकडे कोरोनामुळे लागू केलेली संचारबंदी तर दुसरीकडे अवकाळी पाऊस या दुहेरी संकटामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार असल्याचे आश्वासन कृषीमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी नाशिक येथे झालेल्या बैठकीत दिले आहे.
सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आणि राज्यात जमावबंदीचे आदेश काढले आहेत. यामुळे शेतातील उभे पीक मजुरांअभावी काढणीविना शेतात तसेच पडून आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. असे असतानाच सोमवारपासून अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी तातडीने गुरुवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार खासदारांच्या उपस्थितीत बैठक घेतली. बैठकीत भुसे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करणार असल्याचे स्पष्ट केले असून, येत्या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईदेखील देण्यात येईल हे स्पष्ट केले आहे. भुसे यांनी आश्वसन दिल्याप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत नेमकी कधी मिळणार? ही बाब मात्र अनिश्चित आहे.