नाशिक - केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून, संतप्त शेतकऱ्यांकडून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. जोपर्यंत निर्यातीवरील बंदी उठवली जात नाही, तोपर्यंत रस्त्यावर ठिय्या करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे उमराणे येथे महामार्गावर वहतूक विस्कळीत झाली होती.
हेही वाचा सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांद्याचे भाव कोसळणार
केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यानंतर त्याचे पडसाद आता नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उमटू लागेल आहेत. सकाळी शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी नेल्यानंतर व्यापाऱ्यांनी बोली लावण्यास नकार दिला. याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात रास्ता रोको आंदोलन केले.
केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार व्यापारी 500 क्विंटल कांदा खरेदी करू शकतो. बाजारात आवक वाढल्यानंतरही कांद्याची खरेदी मंदावल्याने भाव 500 ते 1000 रुपयांनी घसरले आहेत. यातच भविष्यात बाजार समित्या काही काळ बंद राहणार असल्याचे चित्र असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.
हेही वाचा सरकारचा कांदा निर्यातबंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्याला मातीत घालण्याचे षडयंत्र - डॉ. अजित नवले
यामुळे शकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वत:ची वाहने बाजार समितीच्या आवारात उभी करून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.