नाशिक - कांद्याच्या भावात रोज होत असलेली घसरण बघून संतप्त शेतकऱ्यांनी आज नांदगाव बाजार समितीच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली आणि लिलाव बंद पाडला. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचा निषेध केला. तसेच बाजार समितीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कांद्याला भाव देताना पारदर्शिता ठेवली नाही. त्यामुळे, संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर आपला रोष व्यक्त केला.
नांदगाव बाजार समितीत आज कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले होते. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने तसेच भाव देताना पारदर्शिता न ठेवल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला आणि शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. काल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी १८ रुपये भाव मिळाला होता. त्यात २०० ते ४०० रुपयाची घट होऊन आज १४०० ते १६०० रुपये इतका भाव मिळत आहे. नांदगाव प्रमाणे मनमाड, लासलगावसह इतर बाजार समित्यांमध्ये देखील आज कांद्याच्या भावात घसरण झाली. त्यामुळे, चिंताग्रस्त शेतकऱ्यांनी आज बाजार समितीत निदर्शने केली.
शेतकरी संतप्त झाले असल्याचे बघून व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने तात्काळ पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना शांत करण्याचे प्रयत्न केले. मात्र, संतप्त झालेले शेतकरी मानत नव्हते. त्यामुळे, त्यांनी लिलाव बंद ठेवत निदर्शने सुरूच ठेवली. शेवटी काही मंडळींनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
हेही वाचा- 'महाविकास आघाडी'विरोधात भाजप महिलांचे तीव्र आंदोलन