दिंडोरी (नाशिक) - जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नगदी पीक म्हणजे भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता परिणाम पाहता शेतीमाल कुठे विकायचा? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. त्यामुळे ऐन हंगमाच्या काळात लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पादन घेण्यासाठी लागलेला खर्च देखील यामधून निघू शकला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
दिंडोरी तालुक्यात वरंवडी शिवनई, जानोरी, आंबे, उमराळे बु, कोचरगाव, पिंपळनारे, ढकांबे, नाळेगाव, राशेगाव, चाचडगाव, वनारे निगडो, आवनखेड या भागात दुधीभोपळा, कारले, दोडका, हिरवी मिरची ही पिके घेतली जातात. तसेच वनारे निगडो, माळेदुमाला, औताळे,आवनखेड या गावामध्ये कोथिंबीर, वाल, निगडोळ भोपळा, वालपापडी, कोबी, फ्लॉवर ही पिके घेतली जातात. मात्र, यंदा मार्च महिन्यात लॉकडाऊन लागले आणि शेतकरी घरातच अडकून पडला. त्यामुळे भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले.
भोपळा पिकासाठी लागवडीपासून तर तोडणीपर्यंत दीड ते दोन लाख रुपये खर्च झाला. माल तयार झाल्यानंतर एक भोपळा ठेवण्यासाठी २ रुपयांप्रमाणे प्लास्टीक पिशवी, एका कॅरेटमध्ये १८ भोपळे त्यानुसार ३६ रुपयांच्या पिशव्या. तसेच २० रुपये प्रति कॅरेट भाडे आमि मजूरी इतका सर्व खर्च आला. त्यातही डावणी, करपा, मिल, बग, नाग, आळई या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशक पावडर मारावी लागत होती. मात्र, विक्री केल्यानंतर पाहिजे तसे पैसे मिळाले नाही, असे शेतकरी विशाल जाधव सांगतात.
लागवडीचा खर्चही विक्रीमधून निघत नसल्याने खेडगाव येथील महेश ठूबे या शेतकऱ्याने फ्लॉवर व भोपळे फुकट ग्रामस्थांना वाटला होता. तसेच भाजीपाला विक्रीसाठी जायचे झाले तर कोरोनाची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतीमालाला ऑनलाईन बाजारपेठ आणि हमीभाव भेटला पाहिजे, अशी मागणी युवा शेतकरी विशाल जाधव यांनी केली.