नाशिक- कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अत्यावश्यक सुविधा सोडून बाकी सर्व दुकाने, आस्थापने बंद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातही आठवडी बाजार बंद करण्यात आले. यामुळे भाजीपाला कसा विकावा, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत होता. मात्र, त्यावर उपाय काढत दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी येथील आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी घरोघरी जाऊन पालेभाजी विकण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
अहिवंतवाडी येथील आदिवासीबहूल भागात मोठया प्रमाणावर भाजीपाल्यांचे पीक घेतले जाते. दीड महिण्यापूर्वी या भागातील शेतकऱ्यांनी मेथी, कोथिंबीर, शेपू पालक, मुळे, वांगी, भोपळा अशा पालेभाजी पिकांची लागवड केली होती. हे पालेभाजी पीक आता विक्रीसाठी तयार आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील खेडगाव, वणी, कोशिंबे, भनवड, चौसाळे, ननाशी, जानोरी, मोहाडी, लखमापूर आणि इतर सर्वच गावातील आठवडी बाजार बंद झाले आहेत. त्यामुळे तयार भाजीपाला आता विकावा कसा, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. मात्र, शेतकऱ्यांनी यावर उपाय काढत आता घरोघरी जाऊन भाजीपाला विकण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी एक किलो मेथीची जुडी दहा रुपयाला विक्री करून आपला खर्च वसूल करण्यासाठी धडपड करत आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनमाडच्या 'नगिना' मशिदीतील नमाज बंद