नाशिक - राज्यातील पाणीदार जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याला ओळखले जाते. त्याच नाशिक जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील शेतकरी भीषण दुष्काळामुळे शहराकडे स्थलांतरित झाले आहेत.
शहराच्या पेठरोड आणि त्र्यंबक रोडलगत असलेल्या मोकळ्या जागेत काही लोकांनी आपला संसार थाटला आहे. हा संसार आणि पेटलेल्या चुली कुणी भिक्षुकांच्या नाहीत तर ते आहेत नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या. गावाकडे पडलेल्या भीषण दुष्काळामुळे त्र्यंबकेश्वर, हरसुल, पेठ या तालुक्यांमधील आदिवासी शेतकरी नाशिक शहराकडे स्थलांतरित झाले आहेत.
या स्थलांतरित आदिवासी शेतकऱ्यांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यावरच आपला संसार थाटला आहे. पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, अशा ठिकाणी उघड्यावर दगडांची चूल करून त्यावर स्वयंपाक करायचा आणि हाताला मिळेल ते काम करायचे असा या स्थलांतरित लोकांचा दिनक्रम असतो.
दुष्काळामुळे गावाकडे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून मैल अन् मैल भटकंती करूनही प्यायला पाणी भेटत नाही. तसेच पाणी नसल्याने शेतातही काही पिकत नाही. परिणामी गावाकडे रोजगाराची साधने उपलब्ध नाही. त्यामुळे हे लोक शहराकडे स्थलांतरित होत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, हरसूल या पाणीदार तालुक्यातील, गावातील आणि वाड्यावस्तीवरील नागरिक पाणी आणि रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतरित झाले आहेत. मुंबईसह अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागविणाऱ्या या तालुक्यातील स्थलांतरित लोकांचे हे विदारक चित्र नाशिक जिल्ह्याच्या भीषण दुष्काळाचे वास्तव्य करण्यासाठी पुरेसे आहे.