नाशिक - कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे आणि याचा परिणाम अनेक सण-उत्सवारंवार होत आहे. शेतकऱ्यांचा सवंगडी, साथीदार म्हणून बैलाला ओळखले जाते. त्याच बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा बैल पोळा हा सणही यंदा कोरोनाच्या संकटात शांततेने साजरा करावा लागणार आहे. मात्र, शेतकऱ्यांमधील उत्साह कमी झाला नसून बैल सजावटीसाठी लागणाऱ्या साहीत्याची खरेदी शेतकरी करकत आहेत.
शेतकरी दरवर्षी आपल्या बैलांना सजवून बैल पोळ्यादिवशी मिरवणूक काढतात. मात्र यंदा कोरोनामुळे मिरवणूक काढता येणार नाहीत. मात्र, यंदा पाऊस चांगला झाल्याने पीके उत्तम आली आहेत. त्यामुळे मिरवणूक नाही तरी बैलांना सजवण्याची शेतकऱ्यांची हौस आजही तशीच आहे. सध्या कोरोनामुळे गावांतील आठवडी बाजार बंद झाल्याने शेतकऱ्या बैलांच्या सजावटीचे साहित्य घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा नाशिक शहरात जावे लागत आहे. बाजारात घुंगरू, रंग, शेम्ब्या, सिंगदोरी, बाशिंग या सजावटीच्या वस्तूंच्या किंमती 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे साहित्यांची मागणी घटली आहे.
बैल पोळ्या दिवशी शहरी भागांमध्ये नागरिक मातीच्या बैलांची पूजा करत असतात. पूर्वी केवळ मातीचे गुलाबी रंगाचे बैल पहावयास मिळायचे. पण, आता पीओपी तसेच चिनी मातीपासून तयार केलेले बैल बाजारपेठांमध्ये उपलब्ध असल्याने नागरिकांचे लक्ष याकडे जास्त आकर्षित होत आहे.