लासलगाव ( नाशिक) - कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव देण्याची मागणी व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने सोशल मीडियावर कमेंट्स आंदोलन सुरू केले आहे. या अनोख्या आंदोलनाद्वारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या व्हिडिओज व मेसेज च्या खाली कमेंट बॉक्समध्ये कांद्याला तात्काळ तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा दर द्या, अशी मागणी करायची आहे. सदरची मागणी ही मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेत कांदा उत्पादकांनी करावी असे आवाहन देखील यावेळी संघटनेकडून करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्री पर्यंत आणि विरोधी पक्षनेते पासून ते आजी-माजी सर्व आमदार खासदारांच्या व्हिडिओज व मेसेजच्या खाली कमेंट बॉक्समध्ये शेतकऱ्यांनी कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव देण्याची मागणी करत कमेंट्स करायच्या आहेत.