नाशिक - दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील संजय भास्कर देशमुख या शेतकऱ्याने अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानमुळे न्यूऑन नामक विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
देशमुख यांच्यावर मोहाडी कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्ज असून, इतरही काही बँकांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडे दीड एकर जमिनीवर द्राक्ष बाग होती. अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
गुरुवारी (31 नोव्हेंबर)ला रात्रीचे जेवण झाल्यानंतर घराबाहेरील जागेत संजय देशमुख झोपले होते. सकाळी मुलगा उठल्यानंतर त्याने वडिलांच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहिले. यावेळी त्याला वडिलांच्या बाजूलाच न्यूऑन औषधाची बाटली पडल्याचे दिसल्याने तत्काळ त्यांना रुग्णालयात हालवण्यात आले. काही वेळानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संबंधित घटनेनंतर दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यंदा परतीचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गारपीटीचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसल्याने आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांवरचा आर्थिक बोजा वाढण्याचे संकट आहे.
देशमुख यांच्या मृत्यूनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने 100 टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱयांकडून होत आहे.