नाशिक - आज कुणाला 10 रुपये मिळाले, तरी कुणी परत करत नाही. मात्र, नजरचुकीने आलेले थोडे नाही तर तब्बल 60 हजार रुपये एका प्रामाणिक शेतकऱ्याने परत केले आहे. मनमाड बाजार समितीमधील शेतकरी भावराव एडवर्ड शिंदे यांनी मका विकून जास्त आलेले 60 हजार व्यापाऱ्याला परत दिले.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की मनमाड येथील शेतकरी भाऊराव शिंदे यांनी 16 डिसेंबरला त्यांच्याकडील 55 क्विंटल मका मनमाड बाजार समितीत प्रतीक ट्रेंड्स कंपनीला विकला. बाजार भावाप्रमाणे शिंदे यांना 1 लाख 7 हजार रुपये देण्यात आले. ते पैसे पिशवीत ठेऊन शिंदे घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी पैसे मोजले तेव्हा त्यात त्यांना 60 हजार रुपये जास्त आढळून आले.
हेही वाचा - दिंडोरीत अचानक आलेल्या धुक्याच्या लाटेने द्राक्ष बागायतदार धास्तावले
रात्र झाली असल्याने शिंदे यांनी ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी दादा बंब यांचा नंबर मिळविला आणि घरी बोलावून ते पैसे परत केले. या शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा बघून बंब यांनी शिंदे यांचे आभार मानले. तसेच मंगळवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सर्व व्यापारी, संचालक तसेच कर्मचारी यांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. शिंदेंच्या या प्रामाणिकपणाने माणुसकी आजही जिवंत असल्याचे दाखवून दिले. याबाबत याबाबत व्यापारी संघटनेने त्यांचे आभार मानले असून अनेक ठिकाणाहून शिंदे यांचे प्रामाणिकपणाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.
हेही वाचा - बांधकाम ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या