नाशिक - मका पिकावर लष्करी अळीने हल्ला चढवला असून नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील पन्नास टक्के मका पीक बाधित झाले आहे. लष्करी अळीचे थैमान रोखण्यात अपयश आल्याने देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील नंदलाल निकम या शेतकऱ्याने चार एकरावरील मका पीकावर नांगर फिरवला आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून कसमादे भागात लष्करी अळीच्या हल्ल्यामुळे ५० टक्के क्षेत्रावरील मका पिकाचे नुकसान झाले आहे. या भागात मका हेच खरीपाचे प्रमुख पीक आहे. गेल्या दोन आठवड्यात ८० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, पंधरा दिवसातच लष्करी अळीचे थैमान सुरू झाले आहे.
देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील शेतकरी नंदलाल निकम यांनी चार एकर क्षेत्रात मका लागवड केली होती. कीटकनाशक फवारूनही अळी आटोक्यात न आल्याने त्यांनी चार एकरावरील उभ्या कोवळ्या पिकावर नांगर फिरवला आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना लष्करी अळीपासून पीक वाचवण्यासाठी मार्गदर्शन करावे, नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.