नाशिक - निफाड तालुक्यातील शेतकरी शरद शिंदे यांनी तब्बल साडेआठशे किलो निर्यायतक्षम काकडी शेतातून काढून लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी रात्रंदिवस रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या पोलिसांसाठी भेट म्हणून दिली आहे. शरीराला लाभदायी ठरणारी काकडी मिळाल्याने पोलिसांनीही या शेतकऱ्यांचे आभार मानले असून शिंदे यांच्या या संकल्पनेचे व औदार्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनीदेखील कौतुक केले आहे.
निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील शरद शिंदे हे मध्यमवर्गीय युवा शेतकरी आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते राज्य शासनाचा कृषी पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. तसेच शेततळे, पॉलिहाऊस, कृषी विभागाच्या फलोत्पादन अभियान या योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या आहेत. देशसेवा करणाऱ्या हातांना आपलेही बळ लाभो या विचाराने शिंदे यांनी निर्यात गुणवत्तेची सुमारे साडेआठशे किलो काकडी शहरातील बंदोबस्तावर असणाऱ्या सुमारे तीन हजार पोलीस बांधवांना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून वाटप केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून युरोपीयन देशात जाणाऱ्या शेतमालावर मोठा परिणाम झाला आहे. हवाई, जल वाहतूक बंद आहे. त्यामुळे शेतमालाचे निर्यात बंद आहे. काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात द्राक्ष, काकडी व इतर फळे विकून नुकसान कमी करण्यावर भर दिला, तर काहींनी संकट काळात अडकलेल्या नागरिकांना, निवारागृहात आपला शेतमाल भेट म्हणून दिला.
कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना नाशिक शहरातील विविध चौकात चेक पोस्टवर दिवसभराच्या उन्हात बंदोबस्ताला उभे राहावे लागत आहे. नाशिकचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला आहे. मात्र, लोकसेवेसाठी 'ड्युटी फर्स्ट' मानणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही माणुसकीची सावली आणि आपुलकीची गरज असते. या संचारबंदीच्या काळात शेतकऱ्यांचा कृषिमाल नागरिकांपर्यंत पोहोचावा म्हणून पोलिसांनी विविध प्रकारची मदत केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
वाढत्या तापमानात काकडी गरजेची -
या काकडीचे वैशिष्ट्य असे, की तहान, ज्वर, शरीर दाह, गर्मीचे सगळे दोष, चर्म रोगात काकडी लाभदायक आहे. या काकडीचा रस किडनी स्टोनमध्ये लाभदायक आहे. मधुमेहामध्ये पण लाभदायक आहे. गुडघे दुखीला दूर करण्यासाठी जेवनात काकडीचे सेवन जास्त प्रमाणात करायला हवे. उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याला काकडी नक्कीच लाभदायक ठरणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल नष्ट न करता, फेकून न देता तो लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनातर्फे चालवल्या जाणाऱ्या निवारागृह, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवकांच्या माध्यमातून जनहितासाठी दान करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.