नाशिक- दिंडोरी तालुक्यातील हस्ते दुमाला येथील तरुण शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विष्णू पांडुरंग राऊत (व.४१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जाचा झालेला डोंगर कसा फेडायचा या विवंचनेत शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
जेव्हा राऊत यांनी आत्महत्या केली तेव्हा घरातील सदस्य मळ्यात काम करत होते. दरम्यान, त्यावेळी राऊत यांची मुलगी कामानिमित्त घरी आली. तिला आपले वडील अत्यवस्थ अवस्थेत दिसले. तिने कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर राऊत यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. स्वप्निल पाटील यांनी राऊत यांना मृत घोषित केले. त्यानंतर राऊत यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.
दरम्यान, हस्त दुमाला येथील पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत यांच्या पत्नीच्या नावावर शेत जमीन असून चार लाखाचे कर्ज होते. ते घरचे कर्तेपुरुष होते. त्यामुळे कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत राऊत यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा- दिंडोरीत वरखेडा शिवारात शेतमजुराची आत्महत्या