नाशिक- नाशिक मधील नामांकित खाजगी हॉस्पिटल 'अशोका मेडिकवर हॉस्पिटल' विरोधात रुग्णांकडून जादा पैसे आकारल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जादा दराने बिल आकारणी होत असल्याच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने लेखा परीक्षक नियुक्त केले होते. लेखा परीक्षकांनी वारंवार नोटिसा दिल्यानतंर सुद्धा जादा बिल आकारल्याचे चार वेगवेगळे प्रकरण समोर आले.
एकूण तीन लाख ८० हजार रुपयांची जादा बिल आकारणी रक्कम परत न केल्यामुळे नाशिकच्या अशोका मेडीकवर हॉस्पिटल विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णांकडून शासन निर्णयातील नमूद दरापेक्षा जादा रक्कम आकारल्या प्रकरणी फिर्याद नोंदविण्यात आली आहे. याबाबत रुग्णांकडून महापालिकेस तक्रार प्राप्त झाल्या होत्या.
तक्रारी खालील प्रमाणे..
दिलीप संपत आहेर, या रुग्णाने तक्रार केलेली असून त्यांच्याकडून रुग्णालयाने १ लाख २५ हजार ९१९ रुपये जादा आकारणी केली. त्यानुसार अशोका मेडीकवर रुग्णालयास नोटीस देण्यात आली होती. तसेच रुग्णांना पैसे परत करण्याबाबत पत्र देखील देण्यात आले होते. आणि पैसे परत न केल्यास नियमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असेही स्पष्ट केले होते.
तसेच सुरेश लखीचंद लुंकड या रुग्णाने देखील रुग्णालयात उपचार घेत असतांना रुग्णालयाने १६ हजार ९७९ रुपये जादा आकारणी केल्याची तक्रार मनपाकडे केली होती. याचप्रमाणे सचिन नारायण कोरडे, शेख सलीम हाजीसदर मोहंमद या रुग्णांनी देखील रुग्णालयाविरोधात मनपाकडे तक्रार केली होती. वारंवार नोटीस बजावून देखील हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांनी सदरच्या ४ रुग्णांना जादा आकारलेली एकूण रक्कम ३,८०,४८८ रुपये परत केली नाही.
दरम्यान, महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार अशोका मेडीकवर हॉस्पिटलविरोधात साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम -२००५, महाराष्ट्र कोविड-१९ उपाय योजना नियम २०२० यातील विविध तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम १८८ साथरोग प्रतिबंध अधिनियम,१८९७ चे कलम २ व ३ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५८, मुंबई नर्सिंग होम (सुधारणा)अधिनियम २००६ चे कलम ७ व १७ (२) या कलमांनुसार अशोका रुग्णालयाविरुद्ध लेखा परीक्षक मनपा नाशिक यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.