नाशिक - जिल्ह्यातील देवळा-वासोळ येथे थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून याबाबत सहायक अभियंता दीपक गांगुर्डे यांनी देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. १६) देवळा तालुक्यातील वासोळ येथे रामदास सखाराम गवळी यांच्याकडे वीज बिलाची थकीत रक्कम असल्याने वीज वितरण कंपनीचे कर्मचारी गोरख निकम व नितीन पवार हे वसुलीसाठी गेले. ह्यावेळी गवळी यांनी वीजबिल भरण्यास नकार दिला आणि वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. निकम यांनी शिवीगाळ करू नका, असे सांगितले असता रामदास गवळी, अनिल गवळी, गोरख गवळी आणि घरातील इतर महिला व पुरुषांनी निकम यांच्यासह पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी, उपस्थित नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत सहायक अभियंता दीपक गांगुर्डे यांच्या तक्रारी वरून गवळी कुटुंबावर देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर तपास करीत आहेत. दिवसेंदिवस वीजबिल वसुली करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वीज बिल भरण्याची विनंती केली..
आम्ही आमच्या कामाचा भाग म्हणून थकीत वीज बिल भरावे, ह्यासाठी गवळी यांच्या घरी गेलो होतो. त्यांना लवकरात वीजबिल भरावे; नाही तर, आपला वीज पुरवठा करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, त्यांनी अरेरावी करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आम्ही त्यांना शिवीगाळ करू नका, असे म्हटले. मात्र, त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला गवळी कुटुंबातील दोन पुरुषांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर घरातील महिलांनीदेखील आम्हाला मारहाण केली असून ह्याबाबत पोलिसांत तक्रार दिल्याचे वीज वितरण कर्मचारी गोरख निकम यांनी म्हटले आहे.