नाशिक Drug Factory Destroyed : याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज माफिया ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हाती तुरी देऊन फरार झाला होता. या प्रकरणानंतर ड्रग्ज विरोधी कारवाईसाठी पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली. अशात मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी नाशिक शहर पोलीस हद्दीत मोठा ड्रग्स माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याच्या शिंदे पळसे परिसरात असलेला श्री गणेशाय इंडस्ट्रीज या ड्रग्ज निर्मिती कारखान्यावर छापा टाकला. यावेळी कोट्यवधी रुपये किमतीचे 135 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी कंपनी मालकासह कामगारांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या कारवाई नंतर राज्यातील ड्रग्जचं मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महिलेला अटक : तसंच नाशिक पोलिसांनीही शहरातील वडाळागाव भागातील सादिकनगरमध्ये छापा टाकून ड्रग्ज विकणाऱ्या एका महिलेसह आणखी एकाला अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 2 लाखांचं 54.5 ग्रॅम एम. डी. ड्रग्स आणि गांजाचा साठा जप्त केला आहे.
एम डीची घातक नशा : एम डी ही अतिशय घातक नशा आहे. तिच्या आहारी गेलेला व्यसनी अपवाद वगळता यातून बाहेर येतो. मानसोपचार तज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकांनी या एम डी विषयी दिलेली माहिती अशी की, एम डीची नशा केल्यानंतर कमालीची उत्तेजना मिळते. टोकाची एक्ससाईटमेन्ट कुठलेही पाऊल उचलण्याची उर्मी निर्माण करते. या नशेत कुठलीही गोष्ट अशक्य नाही असा आत्मविश्वास निर्माण होतो. यातून अनेक गुन्हेगारी कृत्य घडतात. कधी कधी उत्तेजना आत्महत्या करण्यास, एखाद्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त करते. आर्थिक उणीव किंवा अन्य कुठल्याही करणाने एम डी उपलब्ध होत नाही तेव्हा टोकाच्या नैराश्यातून व्यसनाधीन व्यक्ती आत्महत्या करतो. यापूर्वी अशी अनेक उदाहरणे घडली आहेत. तरुण पिढी या जाळ्यात अडकल्याचे चित्र नाशिक शहरात आहे.
मुंबई पोलिसांची यापूर्वीही कारवाई : मुंबई पोलिसांनी जून, 2023 मध्ये ड्रग्ज माफियावर कारवाई केली होती. यामध्ये मुंबईतील मालाड पश्चिम येथे असलेल्या मालवणी पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियनला अटक केली होती. त्याच्या ताब्यातून 12 ग्रॅम एमडीएमए एक्स्टसी एमडी आणि 12 ग्रॅम एलएसडी डॉट पेपरच्या 20 गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 6 लाख रुपये होती. अशी गुप्त माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती, की एक नायजेरियन ड्रग्ज विकण्यासाठी शहरात येणार आहे. या आधारे कारवाई करण्यात आली.
हेही वाचा: