नाशिक- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचार बंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत. शाळाही बंद असल्याने दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळामधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार तांदूळ, कडधान्य वाटण्यात येत आहे.
हेही वाचा- धक्कदायक..! घशात चॉकलेट अडकल्याने गुदमरून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे उपलब्ध शिल्लक साठा विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटा, असे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी विद्यार्थ्यांना तांदूळ, कडधान्य वाटण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनाली वाघ, ग्रामपंचायत सदस्य गुलाब गायकवाड, गुरुनाथ वाघ, मुख्याध्यापक संदीप झोटींग परशराम राऊत यांची उपस्थिती होती.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारून लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज नववा दिवस आहे.