नाशिक - दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माकपकडून आज माकपचे आमदार जे.पी गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी अर्ज दाखल केला. दिंडोरीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना संधी दिली असून मतदार कधीच त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
दिंडोरीतून भाजपकडून भारती पवार तर राष्ट्रवादीकडून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली असून या मतदारसंघात तिहेरी लढत बघायला मिळणार आहे. हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट कापून भाजपने त्यांच्यावर अन्याय केल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. हरिश्चंद्र चव्हाण व आमची भेट झाली असून आम्ही उमेदवारीसाठी कुठलाही निर्णय घेतला नाही.
लोकांची कामे केली असून लोक मला लोकसभेत पाठवतील, अशी खात्री आहे. शेतकऱ्यांची मुख्य कामे बाकी आहेत ती पूर्ण करण्यासाठी मी लोकसभेत जाईन, विधानसभेत आत्तापर्यंत मी नऊ वेळा निवडणूक लढलो व सात वेळा जिंकलो. सध्याच्या काळात लोकांसाठी मोठ्या प्रमाणात काम केले असून दिंडोरी मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मी आग्रही राहिन, असेही ते म्हणाले.