नाशिक- शहरात वाढती गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अनेक नवीन संकल्पना राबवल्या. मात्र, तरीही गुन्हेगारी रोखण्यासंदर्भात पाहिजे तसे यश नाशिक पोलिसांना आलेले नाही. त्यामुळे गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी पोलीस आणि त्यांना लागणारी यंत्रणा ही अत्याधुनिक असायला पाहिजे. त्यामुळे द्वारका परिसरात एक अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त स्मार्ट पोलीस चौकी बसवण्यात आली आहे.
हेही वाचा-त्र्यंबकेश्वर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त
महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी अशी स्मार्ट पोलीस चौकी नाही. आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या चौकीचे उद्घाटन केले आहे. या स्मार्ट पोलीस चौकीमुळे गुन्हेगारांना वचक बसणार आहे. या चौकीच्या चारही बाजूला डिजिटल सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील प्रत्यक बारीक-बारीक संशयित हालचाली यात टिपल्या जातील. तसेच चौकीच्या बाहेर एक डिजिटल बोर्ड लावण्यात आला आहे. त्यावर शहरातील सर्व हेल्पलाईन नम्बर देण्यात आले आहेत. यामुळे कोणत्याही क्षणी पोलिसांच्या मदतीची गरज पडली तर त्यावरुन जलद संपर्क होऊ शकतो. विशेष म्हणजे या संपूर्ण चौकीची मॉनिटरिंग चौकीमध्ये बसून पोलीस करणार आहेत. त्यामुळे परिसरातील गुन्हेगारांवर आळा बसेल त्याचबरोबर पोलिसांचे देखील मनोबळ वाढणार आहे, असे मत पोलीस आयुक्तांनी व्यक्त केले आहे.