नाशिक- अयोध्येला होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण कोणालाच नाही. भूमिपूजनाच्या वेळी मला जाता आले असते, तर आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण आहे की नाही, याची आपल्याला माहिती नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे. शिरपूरवरून मुंबईला जाताना ते काही वेळ नाशिकमध्ये थांबले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्हाला बोलवले नसले तरीही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वांचे प्रतिनिधी म्हणून भूमिपूजन करणार आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. कोरोना काळात राम मंदिराच्या मुद्याला वादाचे स्वरूप न येऊ देता राज्य सरकारने यावर समन्वय काढण्याची अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
सुशांत प्रकरणी महाराष्ट्र सरकारवर 'यामुळे' येतो संशय
मुंबई पोलिसांवर कोणताही आरोप नाही, याच पोलिसांसोबत मी काम केले आहे. कधी कधी राजकीय दबावामुळे प्रोफेशनलिझममध्ये खंड पडू शकतो, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, बिहार पोलिसांना क्वारंटाईन का केले, त्यांना जो तपास करायचा तो करू द्यावा आणि परत जाऊ द्यावे. चौकशी मुंबई पोलिसांनी करायची की बिहार पोलिसांनी हे सर्वोच्छ न्यायालय ठरवेल. या प्रकरणात जन भावनेचा अनादर होत आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारवर संशय येतो, असे फडणवीस म्हणाले.
तसेच, भाजपने ठाकरे परिवारावर कोणताही आरोप केला नाही. अमृता फडणवीस यांनी केलेले ट्विट हे सुशांत सिंग राजपूत यांच्या विषयावर आहे. त्याचा वेगळा अर्थ काढू नये. याप्रकरणाबाबत जनतेला उत्तर हवे आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. संशयाचे जाळे दूर होईल, असे आम्हाला वाटते. तसेच, संजय राऊतांच्या ट्विटला आम्ही उत्तर देऊ शकतो. मात्र त्यांनी हे ट्विट कोणाला उद्देशून केले हे माहीत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा- नाशिक : तपोवन परिसरात डोक्यात दगड घालून एकाची हत्या