नाशिक - नाशिककरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल एक हजार 200 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यासोबतच नव्याने कोरोना लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील मोठ्याप्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे आता जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांना ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांमध्ये अँक्टिव्ह रुग्णसंख्या 1,200 ने कमी झाली आहे. तसेच नव्याने मिळून येणाऱ्या रुग्णसंख्येत देखील घट झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्याही आता आठ हजाराच्या आत म्हणजे 7,740 इतकी झाली आहे.12 ऑक्टोबरला रविवारी 24 तासांमध्ये 429 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. तर याच काळात 1,075 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांच्या संख्या 646 ने अधिक होती. हीच परिस्थिती 10 आणि 11 ऑक्टोबरला होती. या दिवशी नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णसंख्ये पेक्षा कोरोनामुक्त होण्याचा आकडा मोठा होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात 85,511 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी 76248 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 1 हजार 523 जणांना मृत्यू झाला आहे. सध्या स्थितीत 7740 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.