नाशिक - कोरोनाविषयीच्या अफवांमुळे पोल्ट्री फार्मचा व्यवसाय धोक्यात आला असतानाच याचा थेट परिणाम मकेवर झाला आहे. मक्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरण होत आहेत. त्यामुळे व्यापारी माल उचलेनासे झाले आहेत. या घसरत्या दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, दिलासा देण्यासाठी शासनाने तत्काळ १ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने मका खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी सहकार व पणन मंत्री श्यामराव पाटील यांच्याकडे बागलाणचे आमदार दिलीप बोरसे व मका उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
चीनमधून जगभरात पोहोचलेल्या कोरोना विषाणूचा फटका मका उत्पादकांनादेखील बसला आहे. कोरोना व्हायरस आणि पोल्ट्री उत्पादन याचा कुठलाही संबंध नाही. चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षीत असल्याचे पशुसंवर्धन मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट केले असले तरी देखील सोशल मीडियावरील अफवांचा चिकन खरेदीवर परिणाम होत आहे. परिणामी प्रमुख कोंबडी खाद्य असलेल्या मका पिकाची देखील बाजारात मागणी घटल्याने दर कोसळले आहेत. आजच्या घडीला जवळपास ३५ ते ४० टक्के मका उत्पादकांकडे शिल्लक आहे. मात्र, बाजारभावात दिवसेंदिवस होणाऱ्या घसरणीने मका उत्पादक शेतकरी चिंतेत असून, महाराष्ट्रासह परप्रांतात मक्याला मागणी नाही. प्रत्येक दिवशी बाजारभावात घसरण होत असल्याने बाहेर पाठवलेला माल पुढील व्यापारी खाली करून घेत नाही. शासनाने याचा विचार करून तत्काळ मका प्रतिक्विंटल १ हजार ८०० रु रुपये दराने खरेदीसाठी खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.