नाशिक - येवला तालुक्यातील अंदरसूल प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या खामगाव येथील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वर्षा अहिरे असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
येवला तालुक्यातील अंदरसूल प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी १५ रुग्णांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली. यावेळी वर्षा अहिरेही शस्त्रक्रियेसाठी आली होती. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी तिच्यावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास तिला त्रास होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे नातेवाईकांनी तिच्या त्रासाविषयी ड्युटीवर असलेल्या परिचारिका डोंगरे यांना माहिती दिली.
त्यानंतर डोंगरे यांनी या महिलेला इंजेक्शन दिल्याचे सांगितले. मात्र, यानंतरही वेदना कमी होत नसल्याने नातेवाईकांनी डॉक्टरशी संपर्क साधला. तेव्हा संबंधित डॉक्टरांनी आणि परिचारिकेने 'तुम्ही झोपा, आम्हाला झोपू द्या', अशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेमुळे आरोग्य केंद्रात काही काळ तणावाचे वातावरण होते. मृत महिलेच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात रूग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती.