नाशिक - जिल्ह्यात परतीच्या पावसाच्या हाहाकार माजवला असून यामुळे हजारो हेक्टर शेतीची नासाडी झाली आहे. यात द्राक्ष, सोयाबीन, मका, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याकरता नुकसानग्रस्त झालेल्या शेतकर्यांच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी तसेच विविध संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.
बागलाण तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे या ठिकाणी असलेल्या द्राक्ष बागा वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्यात. येथे शेकडो हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले असून, द्राक्ष उत्पादनाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. परिसरात गेल्या १०-१२ दिवसांपासून अवकाळी पाऊस, दमट वातावरणामुळे मका, बाजरी, द्राक्ष तसेच कांद्याला सर्वाधिक फटका बसला आहे. बागलाण तालुक्यातील आनंदपुर, वाघळे, टेंबे, नामपूर या भागातही दिवाळीच्या दिवशी वादळी वारे आणि धुवाधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष पिकांचे नुकसान झाले. तसेच कापणी करून शेतात ठेवलेला मका व बाजरीच्या कणसांना कोंब फुटल्याने शेतकरी हतबल झाला आहे. उन्हाळी लाल कांद्याची रोपे ढगाळ वातावरणाने खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.
हेही वाचा - नाशकात लष्कर भरतीसाठी देशभरातून हजारो तरुण दाखल, सुविधांअभावी हेळसांड
चांदवड तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. ह्या ठिकाणी बाजरी व मक्याला कोंब फुटलेत त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे कृषी केंद्रावर औषधे बुरशीनाशके औषधे घेण्याकरता शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. निफाड तालुक्यात उगाव नजीक असलेल्या श्रीरामनगरला गारपीट झाल्यामुळे याचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसला आहे. द्राक्ष बागांच्या गोड्याबार छाटण्या जवळपास अंतिम टप्प्यात आहेत, मात्र बागांमध्ये पाणी साचल्यामुळे वेलीच्या ओलांड्यावर मूळ फुटत आहेत. त्यामुळे फुटव्यातील द्राक्ष माल अत्यल्प तयार होत आहे. तर, घडांचा आकार गोल गोळीसारखा होऊन मनी गळत आहेत. तसेच फवारणी करूनही पीक हातात येण्याची शक्यता राहिली नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
हेही वाचा - भाऊबीजेसाठी बहिण पाहत होती भावाची वाट; मात्र मिळाली त्याच्या हत्येची बातमी
लासलगावमध्ये देखील अवकाळी पावसाचा ऊसाला फटका बसला आहे. निफाडमधील सोनवाडी, शिवडी, विंचूर, देवगाव, टाकळी, नैताळे, भरवस या भागातील शेतीमालाला फटका बसला आहे. तर, मका, सोयाबीन, भुईमूग, कांदा तसेच भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांनी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले. तसेच, प्रशासनानेही त्याची दखल घेत नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - भाऊबीजेसाठी बहिण पाहत होती भावाची वाट; मात्र मिळाली त्याच्या हत्येची बातमी
शासकीय अधिकारी-कर्मचारी हे पंचनामे करून अहवाल लवकर सादर करतील असे म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाचे तहसीलदार जिल्हा परिषदेचे बीडीओ, तालुका कृषी अधिकारी आणि पिक विमा कंपन्याच्या प्रतिनिधींची पथके तयार केली असून ठिकठिकाणी पंचनामा केले जात आहे. अनेकदा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यात अडचण येते. परंतु यावेळी अधिकाऱ्यांसोबत आता पिक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागीही असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वाढली आहे.
हेही वाचा - परतीच्या पावसाचा चांदवड तालुक्यात कहर; द्राक्षबागा उद्ध्वस्त