येवला (नाशिक ) - नाशिक जिल्ह्यातील पूर्व दुष्काळी भागात यंदा पावसाने चांगलीच मेहरबानी केली. मात्र, या पावसाचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. येवला तालूक्यातील नगरसुल मंडलात अद्याप अनेक पिके पाण्याखाली असल्याने ती हातची सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय.
तालुक्यातील नगरसुल परिसरात सतत जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यातच मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाल्याने पीक सुध्दा पाण्याखाली गेली. नगरसुलच्या सुनिल बोढारे यांनी दहा ते पंधरा गुंठ्यात घरच्यासाठी भूईमूगाची लागवड केली होती. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने त्यांच्या संपूर्ण शेतात आठवडा उलटून सुध्दा पाण्यातच असून शेतात गेल्यावर गुडघाभर पाय जमिनीत रुतत असल्याने ज्यादा पैसे देऊन सुध्दा मजूर येण्यास तयार नाही. सगळेच पीक पाण्याखाली असल्याने त्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक पाण्यात असल्याने ते काढता सुध्दा येत नसल्याचे सांगत केलेला सगळा खर्च वाया जाणार आहे. तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी भूईमुग काढला असला तरी त्यालाही कोंब फुटत असल्याच पाहावयास मिळतेय.