नाशिक - गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सागर हजारी असे हल्ल्यातील जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवर पोलिसांच्या छावण्या उभ्या आहेत. मात्र, त्याच रात्री नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात एका टोळक्याने गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर जबरी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने नाशिकमध्ये गुन्हेगारीची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे.
या हल्ल्यातील जखमी सागर हजारी या पोलीस कर्मचाऱ्याचे वडील, भाऊ, वहिनी असे सर्वचजण पोलीस खात्यात आहेत. त्यामुळे या हल्ल्याच्या घटनेने त्यांचेही मनोबल खचले आहे. या टोळक्याच्या मारहाणीत सागर हजारी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जखमी पोलीस कर्मचाऱ्यांचे वडिल अमरसिंह हजारी यांनी दिली.
या घटनेनंतर पोलिसांनी 13 आरोपींना कोम्बिंग ऑपरेशन करुन अटक केली आहे. यातील 4 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांनी सांगितले. तर या घटनेमुळे शहरातील पोलीसच असुरक्षित असल्याची भावना सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.