नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांसोबतच मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. मृतांची वाढत्या संख्येचा ताण अमरधाम येथील यंत्रणेवर येत असून मृताच्या अंत्यसंस्कारसाठी बेड मिळत नाहीए. त्यामुळे नाईलाजाने जमिनीवरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईकांवर येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रोज 2500 पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. 12 ते 15 जणांचा दिवसाला मृत्यू होत आहे. त्यामुळे जिथे अमरधाममध्ये दिवसाला 5 ते 6 मृतदेह अंत्यसंस्कार साठी येत होते, त्याची संख्या आज 15 ते 20 वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे अमरधाम येथील कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. पंचवटी येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी 9 बेड असून मृतदेहांची संख्या वाढत असल्याने नाईलाजाने जमिनीवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. याचा ताण येथील कर्मचाऱ्यांवर देखील येत आहे. कर्मचाऱ्यांना 24 तास काम करावे लागत आहे.
शहरात कोरोना रुग्ण वाढत असताना नॉन कोविड रुग्णांच्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. महानगरपालिकेच्या पूर्व भागाच्या अमरधाममध्ये गॅस व विद्युतदाहिनी तांत्रिक कारणामुळे बंद पडल्याने या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ही विद्युतदाहिनी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी सामाजिक संघटनानी केली आहे.
कोरोनामुळे नातेवाईक जवळ येत नाहीत -
कोरोनामुळे मृतांची संख्या वाढली आहे. आम्ही काम करत असलेल्या पंचवटी अमरधाममध्ये 9 बेड असून गेल्या चार दिवसांपासून 12 ते 15 मृतदेह रोज येत आहे. यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहाची संख्या अधिक आहे. त्यामुळे आम्ही अनेक मृतदेहांचे अंत्यसंस्कार जमिनीवरच करत आहोत. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे नातेवाईक पण मृतदेहाला हात लावत नाही. मग आम्हीच त्यांच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडतो. रात्रभर जागून आम्ही सेवा देत आहे. आम्ही नातेवाईकांना सांगतो की, मृत्यू झालेली व्यक्ती आपलीच आहे. तुम्ही काळजी घेऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी आम्हाला मदत करा, पण नातेवाईक पुढे येत नाही. अस्थी घेण्यासाठी देखील अनेकांना भीती वाटते, अशी माहिती येथील महिला कर्मचारी सुनीता पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाचा उद्रेक; गुरुवारी 5504 नवीन रुग्ण, 14 जणांचा मृत्यू