नाशिक - 'देव तारी त्याला कोण मारी' याचा प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. दाम्पत्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नात पंख्याला लावलेल्या ओढणीची गाठ सुटल्याने पत्नीचा जीव वाचला आहे. मात्र, यात पतीचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - दारू पिताना झाला वाद... मित्रानेच केला मित्राचा घात...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील जीग्नेश धुमाळ आणि काजल गावित यांनी घरातून पळून जावून सप्तशृंगी देवीच्या गडावर लग्न केले होते. तेथे काही दिवस राहिल्यानंतर ते नाशिकच्या आडगाव नाका येथे राहण्यासाठी आले होते. येथीलच पाण्याच्या प्लांटवर ते कामाला होते. त्यानंतर वाद होऊ लागले आणि यातूनच दोघांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात दुर्दैवाने पती जीग्नेश धुमाळ यांचा मृत्यू झाला, तर पत्नी काजलच्या ओढणीची गाठ सुटल्याने तिचा जीव वाचला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेनंतर 'देव तारी त्याला कोण मारी' ही म्हण काजलच्या बाबतीत खरी ठरली.
हेही वाचा - विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या जीम ट्रेनरला अटक