नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भात दिवसागणिक वाढत आहे. दररोज नव्या रुग्णांची मोठी भर पडत आहे. अशात नाशिकच्या काही नामांकित खासगी रुग्णालयामध्ये संशयित रुग्णाला कोरोनाचे लक्षण असल्यास त्याला एचआरसीटी (सिटी स्कॅन) करणे बंधनकारक केले आहे. यामुळे रुग्णांना या टेस्टसाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत.
नाशिक जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत असून आतापर्यंत 30 हजाराहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 785 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन अथक प्रयत्न करत आहे. तर महानगरपालिकेकडून प्रत्येक प्रभागात कोरोना संशयित नागरीकांची अँटीजेन चाचणी केली जात आहे.
कोविड चाचणीमध्ये कोरोनाची लक्षण असूनसुद्धा रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर त्याला एचआरसीटी (सिटीस्कॅन) करण्यास सागितले जाते. अशा वेळी तो रुग्ण सिटी स्कॅन करण्यासाठी गेला तर त्याला खाजगी रुग्णालयामध्ये आणि डायग्नोस्टिक सेंटरमध्ये 5 ते 6 हजार रुपये या चाचणीसाठी आकारले जात आहे. महत्वाची बाब म्हणजे ही चाचणी शासकीय रुग्णालय फक्त 500 रुपयांमध्ये होते. खासगी रुग्णालये आणि डायग्नोस्टिक सेंटर सिटी स्कॅनच्या नावाखाली रुग्णांकडून जास्तीचे पैसे घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय काही रुग्णालयांनी ही चाचणी बंधनकारकच केली आहे.
एखाद्या रुग्णाला कोरोनाची लक्षण आहेत. मात्र त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर त्याला डॉक्टर तपासून एचआरसीटी (सिटीस्कॅन) करण्यास सांगत असतात. यात अनेक रुग्ण गुगलवरून कोविड बाबत माहिती घेत, स्वतःच एचआरसीटी (सिटीस्कॅन) मागणी करत असल्याचे मनपाचे नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.
हेही वाचा - नाशिकमध्ये गेल्या सात महिन्यात एक लाखांपेक्षा जास्त बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई
हेही वाचा - बरं झालं सुशांतचा तपास 'सीबीआय'कडे गेला - मंत्री छगन भुजबळ