नाशिक/सटाणा - कोरोनाच्या भीतीने सर्वजण हैराण झाले असतानाच तृतीय पंथीयाला मारल्यामुळे कोरोनाची साथ पसरल्याच्या अफवा शहरी भागासह ग्रामीण भागात वार्याच्या वेगाने पसरत आहेत. या अफवेवर विश्वास ठेवून कोरोना होऊ नये, म्हणून अंधश्रध्दाळू महिला चक्क पिठाच्या कनकेचे दिवे कडूनिंबाच्या झाडाखाली ठेवत आहेत. या सर्व प्रकाराला अंधश्रध्दा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला असून या खोडसाळ अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
कोरोनाच्या साथीने अनेकांची झोप उडवली आहे. वारंवार कोरोनाचेच वृत्त कानावर पडत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे अनेकांनी देवाचा धावाही सुरू केला आहे. काही ठिकाणी जप तप केले जात आहेत. तर काही ठिकाणी अफवांना पेव फुटले आहेत.
अशी आहे अफवा
एका तृतीय पंथीयाचा छळ करून त्यास कुणीतरी मारल्याने त्याने शाप दिला असून त्यामुळेच कोरोनाची साथ पसरली आहे. आपल्याला व आपल्या कुटुंबाला लागण होऊ नये म्हणून कडूनिंबाच्या झाडाखाली कनकेचे दिवे लावल्यास बाधा होणार नाही व कोरोना रोग पळून जाईल, अशी ही अफवा आहे. अफवेवर विश्वास ठेऊन अनेक सुशिक्षित लोक मूर्ख ठरत आहेत. महिला फोनद्वारे आपल्या नातेवाईकांना माहिती कळवून दिवे लावण्यास सांगत आहेत. परिसरातील अनेक अंधश्रद्धाळू महिला व मुले कडूनिंबाच्या झाडाखाली दिवे लावण्यासाठी गर्दी करत आहेत.
एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत जग विज्ञानवादी होत असताना, आजही अशा भंपक अफवांवर विश्वास ठेवत अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिले जात असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चिंता व्यक्त केली आहे.