नाशिक - कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करूनही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. त्यामुळे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी एक नामी शक्कल लढवली. त्यांनी नाशिकरोडच्या बिटको चौकात भव्य अशी कोरोना विषाणूची प्रतिकृती पेंटींगच्या माध्यमातून साकारली आहे.
या पेंटींगच्या माध्यमातून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा संदेश दिला जात आहे. बाहेर पडाल तर रस्त्यातच कोरोना तुम्हाला अडवेल, असा संदेश देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा एकच रुग्ण आहे. मात्र, खबरदारी म्हणून नागरिकांनी गरज नसल्यास बाहेर पडू नये, असे आव्हान वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी केले आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करत घरात राहणे गरजेचे असल्याचे सुरज बिजली यांनी सांगितले.