नाशिक - महाराष्ट्रात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत अनेक दिवस लागत असल्याने अनेक प्रकरणांमध्ये रुग्ण दगावल्यानंतर कोरोना रिपोर्ट आल्याचे समोर आले आहे. ह्यावर आता नाशिकच्या इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन ह्या कंपनीने एक्सरेच्या माध्यमातून अवघ्या 5 मिनिटांत संशयित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे तंत्र विकसित केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर ह्याचा महाराष्ट्रातील 20 हून अधिक हॉस्पिटलमध्ये वापर केला जात असल्याचे इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन संचालक पीयूष सोमाणी यांनी सांगितले आहे.
कोरोना विषाणूने जगातील अनेक देशांना हैराण करून सोडलं आहे. भारतातदेखील एक लाखाच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून हजारो जणांचा ह्या आजाराने बळी घेतला आहे. आजही कोरोनावर योग्य उपचार मिळत नसल्याने अनेक देश हतबल झाले आहेत. भारतामध्ये महाराष्ट्रात सर्वधिक रुग्ण आढळून आले असून दिवसेदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे आणि दररोज हजारो कोरोना संशयितांची चाचणी केली जात आहे. मात्र, लॅब आणि मनुष्यबळ कमी असल्याने रिपोर्ट येण्यास वेळ लागत आहे. हीच बाब डोळ्यांसमोर ठेवून नाशिकच्या इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन एए+कोविड-19 टेस्टिंग सोल्युशनच्या मदतीने रुग्ण कोरोनाबाधित आहे की नाही हे पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात दर्शविण्यात येते. ही संपूर्ण संपर्कविहिन चाचणी प्रक्रिया आहे. या चाचणीकरिता छातीचा क्ष -किरण तपासणीचा अहवाल घेऊन तो एका वेब ब्राउझरवर अपलोड करणे आणि सबमिट बटणावर क्लिक करणे, इतकेच आरोग्य अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे. अहवाल सबमिट झाल्यावर संबंधित रुग्ण कोव्हिड-19 पासून त्रस्त आहे की नाही लगेच सूचित होते. ही चाचणी आता विविध महानगरपालिका, नागरी रुग्णालये, राज्य सरकारी रुग्णालये आणि देशातील प्रमुख खासगी रुग्णालयामध्ये संकल्पनेचा पुरावा म्हणून यशस्वीरित्या अंमलात आलेली आहे.
भारतातून तसेच अमेरिका ब्रिटन आणि इटलीसह विविध देशांकडून मिळालेल्या हजारो क्ष किरण अहवालांचे स्कॅनिंग इएसडीएसच्या जलद चाचण्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिथे स्वॅबच्या माध्यमातून कोरोना चाचणी करण्यासाठी 4 ते 5 हजार रुपये आकारले जातात तिथेही कंपनी हॉस्पिटलला अवघ्या 150 रुपयांत प्रति व्यक्तीचा तपासणी करून देणार आहे. कोरोनासोबतच ह्या चाचणीच्या माध्यमातून रुग्णांना फुफुफ्सा संदर्भातील इतरही आजारांचे निदान होण्यास मदत होणार आहे.