सटाणा (नाशिक)- बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याची वार्ता तालुक्यात पसरल्याने खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
सटाणा शहरात दोन कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. त्यातच तालुक्याच्या ग्रामीण भागातील ताहाराबाद येथील आरोग्य केंद्रातील कर्मच्याऱ्यास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. बागलाणच्या ग्रामीण भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित ताहराबादच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी म्हणून सेवेत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात इतरत्र सेवा करीत असल्याचे समजते. कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची तपासणी करून त्यांच्या स्रावाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. अखेर हाती आलेल्या रिपोर्टनुसार तो कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने मोसम खोर्यात खळबळ उडाली आहे.
ताहाराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने गावाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यंत्रणा सतर्कतेने कामाला लागली आहे. ताहराबाद गावात जायखेडा पोलिसांनी प्रवेशबंदी करून सील केले आहे. आतापर्यंत बागलाण तालुक्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गावातील संशयिताना तपासणीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे. याशिवाय रुग्णाच्या घरातील कुटुंबीय व नातेवाईकांचेही स्वॅब तपासणी व पुढील कारवाई करण्यात येणार आहे.