नाशिक- जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने नाशिकमध्ये पहिला बळी घेतला. नाशिकच्या मालेगाव मधील एका 51 वर्षीय व्यक्तीचा बुधवारी सकाळी कोरोना सदृश्य आजाराने मृत्यू झाला होता. यानंतर प्रशासनाने या मयत इसमाचे स्वाब नमुने तपासणीसाठी पाठवले होते. बुधवारी रात्री उशिरा या मयत व्यक्तीचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. आणखी पाच नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नाशिक जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे
नाशिक जिल्ह्यात अवघ्या दोन पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांची नोंद होती. मात्र, मालेगावमधील पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 7 वर गेलाय. या पाचही जणांवर मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. नाशिकमधील कोरोनाबाधितांचा आकडा अचानक वाढल्याने सरकारी यंत्रणा देखील धास्तावल्या आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असले तरी नागरिकांनी पुढील काळात सरकारी यंत्रणांना अधिक सहकार्य करणे गरजेचे आहे.
मालेगावमधील नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क करण्यासाठी पावले उचलली आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात नाशिकमध्ये आतापर्यंत दोनच कोरोनाबाधित रुग्ण होते. कोरोनाबाधितांचा आकडा अचानक वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाचे संकट अधिक गडद झाले आहे. गांभीर्यची बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेल्याचे समोर आलाय. त्यामुळे एका दिवसात एकाचा मृत्यू आणि पाच जणांचे पॉझिटिव्ह अहवाल यामुळे शासकीय यंत्रणाना देखील धक्का बसलाय. मालेगाव मधील या सर्व कोरोनाबाधितांची दिल्ली प्रवासाचा इतिहास असल्याने प्रशासनाने आता दिल्ली प्रवास केलेल्या नागरिकांबाबत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. नागरिकांनीदेखील जिल्हा प्रशासनाला पुढील काळात सहकार्य करणे गरजेचे झाले आहे.